स्वर्गीय पुष्पवृक्षाच्या काही बीया होत्या माझ्यापाशी
मातीत पेरून, खरंतर दडवून ठेवल्या आहेत
या बियांची मोठी गंमत असते!
फारसे नियम पळत नाहीत त्या
काहींकडे असतात, काहींकडे नाही
ज्यांच्याकडे असतात त्यांच्या बऱ्याचदा हरवून जातात.
काहींच्या रुजतात उजाड माळरानावर, घनदाट अरण्यात,
किंवा बारमाहा पिके घेत असणाऱ्या जमिनीतही -
तेवढीच जागा आपल्यापुरती करून घेऊन!
काहींच्या मशागत केलेल्या चांगल्या जमिनीतही
अंकुरत नाहीत.
कधी पेरल्या पेरल्या पटकन उगवून येतात
तर कधी पडून राहतात वर्षानुवर्ष
आणि अनपेक्षित क्षणी सरसरत वाढतात आभाळापर्यंत!
कुठे अंकुरलेल्या, कधी अंकुरलेल्या,
यावर त्याची प्रत अवलंबून नाही
माझ्या बिया पडून आहेत किती वर्षे मातीखाली
वाटते गेल्या आता...
पण मधेच त्यांच्या श्वसनाचा उबदार स्पर्श होतो
आणि पुन्हा आशा वाटते.
माझ्या फुलांचे रंगरूप मला माहित नाही
पण गंध हुंगला आहे कधीतरी स्वप्नात
फार फार इच्छा आहे तो गंध फुफ्फुसे भरून पुन्हा हुंगण्याची,
त्या फुलांची माल करून माझ्या प्रियतमांच्या गळ्यात घालण्याची,
त्यावर जर कधी आलीच फळे, माझ्या ऐपतीपलीकडची,
तर त्याच्या अर्काने हे जग अजून थोडे मधुर करण्याची,
आणि थोड्या बिया अनामिकाला देण्याची !
मार्च २०१५
No comments:
Post a Comment