Thursday, May 21, 2020

भूपाळी

फुलाफुलांवर पक्षी गाती
पानांवरती मोती चमकती
फुलली केशर बाग!

साखरझोप सारुनिया आता
जाग साजणा जाग!

निळ्या तळ्याच्या दीर्घ दर्पणी
आकाश निरखते अंगावरची
शुभ्राभ्रांची शाल!

साखरझोप सारुनिया आता
जाग साजणा जाग!

स्वप्नांची दुनिया ती न्यारी
असेल का याहुनही प्यारी?
पहा तूच अन् सांग!

साखरझोप सारुनिया आता
जाग साजणा जाग!

जुलै  २०१७

मैफल आणि शेत

किशोरी गेली, भेमसेनही गेले
आता कोणी बरे गावयाचे गाणे?

विंदा गेले, ग्रेसही गेले
आता वाचण्याजोगे काय राहिले?

खरे म्हणजे आम्हीच उठून गेलो मैफलीतून
आजही पावसात भिजणारे असतीलच, उन्हात घर बांधून...

अस्ते अस्ते मात्र, कळून चुकले आम्हाला
आपल्याकडे नाही पाजळण्यासाठी पलिता
आरश्याने फुकाचा कशाला दाखवावा तोरा?

अशांनी निदान हाती घ्यावा औत,
करावी मशागत, पिकवावे शेत

भांगलणी करतांना आम्ही गातो गाणे,
किशोरीही गेली, भीमसेनही गेले...

जून २०१७

Wednesday, May 13, 2020

सृजन

स्वर्गीय पुष्पवृक्षाच्या काही बीया होत्या माझ्यापाशी
मातीत पेरून, खरंतर दडवून ठेवल्या आहेत

या बियांची मोठी गंमत असते!
फारसे नियम पळत नाहीत त्या

काहींकडे असतात, काहींकडे नाही
ज्यांच्याकडे असतात त्यांच्या बऱ्याचदा हरवून जातात.

काहींच्या रुजतात उजाड माळरानावर, घनदाट अरण्यात,
किंवा बारमाहा पिके घेत असणाऱ्या जमिनीतही - 
तेवढीच जागा आपल्यापुरती करून घेऊन!

 काहींच्या मशागत केलेल्या चांगल्या जमिनीतही
अंकुरत नाहीत. 

कधी पेरल्या पेरल्या पटकन उगवून येतात
तर कधी पडून राहतात वर्षानुवर्ष 
आणि अनपेक्षित क्षणी सरसरत वाढतात आभाळापर्यंत!

कुठे अंकुरलेल्या, कधी अंकुरलेल्या,
यावर त्याची प्रत अवलंबून नाही

माझ्या बिया पडून आहेत किती वर्षे मातीखाली
वाटते गेल्या आता...
पण मधेच त्यांच्या श्वसनाचा उबदार स्पर्श होतो
आणि पुन्हा आशा वाटते. 

माझ्या फुलांचे रंगरूप मला माहित नाही
पण गंध हुंगला आहे कधीतरी स्वप्नात
फार फार इच्छा आहे तो गंध फुफ्फुसे भरून पुन्हा हुंगण्याची,
त्या फुलांची माल करून माझ्या प्रियतमांच्या गळ्यात घालण्याची,
त्यावर जर कधी आलीच फळे, माझ्या ऐपतीपलीकडची,
तर त्याच्या अर्काने हे जग अजून थोडे मधुर करण्याची,
आणि थोड्या बिया अनामिकाला देण्याची !

मार्च  २०१५

एक साधा सोपा चिचार

सगळे नसतात कणखर
प्रत्येकाच्याच असतात मर्यादा
कुणाच्या कमी, कुणाच्या जास्त

तरीही प्रत्येकाचा असतो हक्क
आपली आपली भूमिका निभावण्याचा
स्वतःचे गाणे स्वतःपुरते गाण्याचा
थोडे आनंदी थोडे दुःखी होण्याचा

त्यालाच म्हणतात न्याय !

दुर्बळ आहे एकादा
म्हणून दाबून टाकला त्याला
तर प्रत्येक सबळावर आरोप आहे
त्याच्या खुनाचा

सप्टेंबर  २०१३

Friday, May 8, 2020

ग्रीष्मागम

दिन उष्ण असे दिन तप्त असे
नादावून कोकीळ घाले
शीळ साजणीला
बघ ग्रीष्म सख्या, बघ ग्रीष्म ऋतू आला!

आज अचानक संध्याकाली
मजला दिसली
उन्हाळ्यातली
तलम मलमली
मादक वसने ल्यालेली
मुक्तकुंतला
अतिशय लहरी
अती हवीशी
अशी ती झुळूक
ग्रीष्म ऋतूची

तुज स्पर्श तिचा का होत नसे ?
तुज आज का न लागतसे पिसे ?

तप्त हवेच्या पटलावरती
बघ झुळुकांचा असे ऑपेरा
ऑपेरातली झुळूक जांभळी
संकेताची देता टाळी
चर-अचर बघ नाचू लगे
ग्रीष्म ऋतूचे
नृत्य अधीरे!

चल तूही गडे,
चल तूही माझ्यासवे !

Wednesday, May 6, 2020

लावणीचा प्रयत्न

उत्तर रात्री शेजेवरती जळते माझी काया
कराल का एकदाच मजवर तुमच्या पक्षावाणी माया ?

तुमच्या हाताने माझ्या घास मुखी घाला
पाठीवरती फिरवा माझ्या हात तुम्ही राया

लाडे बोलून जरा कधीतरी हलके कुरवाळा
कधी घालूनी मंजुळ शीळ कळी माझी खुलवा

ज्या पिंजऱ्याला सळ्याच नव्हत्या बंदी करावयाला
दारही नव्हते कधी त्यातुनी सुटुनी जावयाला ...
त्या सोन्याच्या पिंजऱ्याची तमा जरा तरी करा
कराल का एकवार मजवर पक्षावाणी माया ?

१४ जुलै  २०१३

Tuesday, May 5, 2020

परम ज्ञान

नील समंदर के बीचोबीच
एक अकेला महल है;
सभी मुसाफिर कहते है
वह ही मेरी मंजिल है | 

महाबली ने कोशिश की
सेतु वहाँ तक बनाने की | 
नोवा ने नौका बनायी 
प्लेन में चले राईट भाई |

कहते है अमरिकाने
अपोलो भी छोड़ा था,
और खुसरो कहता है,
जो डूब गया वे पार हुवा | 

एक अकेला महल क्या
कभी किसीने देखा है ?
अक्षांश रेखांश उस द्वीपके 
क्या किसीको पता है?

महल अकेला लहरोंपे 
हलके हलके झूल रहा है;
मुसाफिरोंको चकमा दे के
इधर उधर घूम रहा है | 

हाँ हाँ मुसाफिर ,
जा, चला जा ,
रुकना तो तूने है नहीं... 
ये आधी रोटी तो खाले ,
ये ले थोड़ा ठंडा पानी ! 
जून  २०१२

Friday, May 1, 2020

मळभ

आभाळ असे पावसाळले
अन् मन असे हळवे लुळे
एकाद्या झाडावरून जणू
गेली उडून पाखरे...

कधीही पडेल आकाश म्हणून
अंग आवळून बसला ससा
भीतीच्या या सावटातून
अरे सश्या सुटशील कसा?

गेला वसंत सरून तरीही
गात राही कोकिळा
गायची अंतस्थ सक्ती
कशी यातून मुक्तता ?
२३ जून २०१३